"उत्तरदायित्व फाऊंडेशन" नेमके काय आहे?

आमच्या बद्दल

                उत्तरदायित्व फाउंडेशन ही संस्था सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम 1950 अंतर्गत नोंदणीकृत संस्था आहे. भारतीय संविधानातील विचार आणि मूल्ये यांना प्रमाण माणून संस्था कार्यरत आहे . महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादी महापुरुषांच्या विचार व कार्याचा आदर्श ठेवून ‘उत्तरदायित्व फाउंडेशन’ वाटचाल करीत आहे. प्रामुख्याने प्रबोधन व रचनात्मक स्वरूपाचे काम करण्यावर संस्थेचा भर आहे. अहिंसा हे मूल्य संस्थेसाठी शिरोधार्य आहे. संस्थेची भूमिका जात,धर्म,वर्ण व लिंगनिरपेक्ष असून विद्यार्थी, युवक,महिला व समाजातील वंचित व असंघटित घटकांच्या उन्नतीसाठी सनदशीर मार्गाने संस्था काम करीत आहे.
                समाजातील विद्यार्थी, युवक, महिला व वंचित घटकांपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना पोहोचवण्याचे माध्यम म्हणून देखील ‘ उत्तरदायित्व फाउंडेशन ‘ काम करीत आहे. सदरहू योजनांचे लाभ संबंधित घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसंगी प्रसारमाध्यमे विविध पातळ्यांवरील लोकप्रतिनिधी याद्वारे न्याय मार्गाने फाउंडेशन पाठपुरावा करीत आहे. दलित, आदिवासी, ओबीसी, बहुजन तसेच खुल्या गटातील आर्थिक कमकुवत विद्यार्थ्यांसाठीच्या विविध योजना, अंधश्रद्धा निर्मूलन, जातीय- धार्मिक सलोखा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार याबाबत संस्था आग्रहपूर्वक काम करीत आहे.
                देश -विदेशातील सर्व प्रकारच्या शिक्षणाच्या व करिअरच्या संधी, सरकारी हॉस्टेलची माहिती विद्यार्थी व युवकांपर्यंत पोहोचवणे ह्या कामाला ‘उत्तरदायित्व फाउंडेशन’ सर्वोच्च प्राधान्य देते.

"उत्तरदायित्व फाऊंडेशन" कोणते कार्य करणार आहे?

ध्येय आणि धोरणे

  • बहुजन समाजासाठी सरकारने घोषित केलेल्या योजनांच्या अंमलबजावणीचा आग्रह धरणे.
  • विद्यार्थ्यांना जातीचे दाखले शाळांतून देण्याचा आग्रह धरणे किंवा जातीचे दाखले आणि व्हॅलिडीटी कुटुंबाच्या नावे (रेशन कार्ड प्रमाणे) देण्यासाठी सरकारकडे आग्रह धरणे .
  • शालेय आणि कॉलेज विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रकमेमध्ये वाढ करण्याचा अग्रदर करणे.
  • सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासकीय वसतिगृहांची संख्या वाढवण्यासाठी शासन यंत्रणेकडे आग्रह धरणे.
  • अर्थसंकल्पात त्या त्या प्रवर्गाच्या संख्येच्या आधारावर आर्थिक तरतूद करण्यासाठी प्रयत्न करणे.
  • बहुजनांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी माहितीच्या अधिकाराचा वापर करणे.
  • सर्व मागासवर्गीयांच्या हक्क आणि अधिकारांसाठी प्रसंगी जनहित याचिका कोर्टात दाखल करणे.
  • मागासवर्गीयांच्या संबंधात सरकारी योजनांविषयी सांख्यिकी गोळा करणे त्याचे विश्लेषण तज्ञांद्वारे करणे.
  • मागासवर्गीयांवरील अन्याय -अत्याचार विरोधात व हक्क अधिकार यासाठी सरकार दरबारी पत्रव्यवहार करणे तसेच विधानमंडळ व संसद अधिवेशनामध्ये त्यासंबंधात आवाज उठवण्यासाठी लोकप्रतिनिधींशी संपर्क करणे.
  • मागासवर्गीयांचे यांचे हक्क व अधिकार यासाठी व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्र, कार्यशाळा यांचे आयोजन करणे.
  • बुद्ध विहारे, समाज मंदिर इत्यादी ठिकाणी ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे. तशा प्रकारचे अभियान राबवणे.
  • मागासवर्गीयांचे हक्क अधिकार तसेच त्यांच्या प्रबोधनासाठी विविध पुस्तिका/पुस्तके, वार्षिक अंक प्रकाशित करणे.
  • मागासवर्गीयांशी संबंधित एखाद्या विषयावर संशोधन करण्यासाठी अभ्यासकांना पाठ्यवृत्ती देणे.
  • मागासवर्गीयांच्या हक्क व अधिकाऱ्यांसाठी संघर्ष करणाऱ्या तसेच त्यांचे प्रबोधन करणाऱ्या व्यक्ती तसेच संस्थांना पुरस्कार देणे.
  • संस्थेच्या ध्येय व उद्दिष्टांसाठी कवी संमेलन वा साहित्यिक तसेच इतर कलाविषयक उपक्रमांचे आयोजन, प्रदर्शन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.
  • विद्यार्थी व इतरांसाठी वक्तृत्व, निबंध, गटचर्चा, इत्यादी स्पर्धा तसेच लेखन, वक्तृत्व, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा व शिबिरे घेण्यात येतील.
  • फाउंडेशन प्रसंगी इतर समविचारी संस्था व संघटनांसोबत एखाद्या उपक्रमात सहभागी होईल. (अर्थात त्या संघटना सांविधानिक चौकटीत काम करणाऱ्या असतील तर…)
  • एखाद्या संस्थेकडून आर्थिक मदत मिळाल्यास फाउंडेशन मागासवर्गीयांचे हक्क, अधिकार याविषयी जागृती करण्यासाठी तसेच स्वातंत्र्य, समता,बंधुत्व, न्याय, पर्यावरण संरक्षण व वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्यांच्या प्रसारासाठी माहितीपट, शॉर्ट फिल्म्सची निर्मिती करेल.
  • फाउंडेशनआपला निधी उभारण्यासाठी ‘चॅरिटी शो ‘ गायन, नृत्य ( स्टेज परफॉर्मन्स ) इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करेल.

"बहुजन हिताय बहुजन सुखाय"

कार्यकारिणी :

श्री. अर्जुन जगधने

अध्यक्ष

श्री. प्रणितकुमार म्हस्के

सचिव

श्री. रमेश मोहिते

खजिनदार

नोंदणीचे प्रमाणपत्र :

नोंदणी क्रमांक : E-0038758(GBR)

उत्तरदायित्व फाऊंडेशन नोंदणी प्रमाणपत्र : Uttardayitva Foundation Trust Registration Certificate

१२ अ प्रमाणपत्र :

८० ग प्रमाणपत्र :

Scroll to Top