उत्तरदायित्व फाऊंडेशन आणि गोरेगाव येथील नंदादीप विद्यालय यांच्या संयुक्त प्रयत्नातून नंदादीप विद्यालयातील पालकांना समजल्या त्यांच्या आर्थिक हिताच्या शासन योजना.
मुंबई गोरेगाव येथील नंदादीप विद्यालयाच्या कलाघरात दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी पालकसभेचे औचित्य साधून शासकीय योजनांच्या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कामगार आयुक्तालय, ब वर्ग, कामगार अधिकारी पदावर कार्यरत असलेले श्री. सुनील राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदादीप विद्यालयातील पालकांना शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला 200 पेक्षाही जास्त पालकांनी उपस्थित राहून महाराष्ट्र शासन कामगार विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या शासकीय योजना समजून घेतल्या.
कामगार वर्गातील पालक घेतील योजनांचा लाभ
दरवर्षी महाराष्ट्र शासन नागरिकांसाठी विविध आर्थिक योजना जाहीर करीत करते. परंतु अनेक शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याने त्यांना योजनांचा लाभ घेता येत नाही. बरेचदा कागदोपत्री व्यवहार कोण करेल? या विचारातून ज्यांना गरज असते आणि जे लाभार्थी बनू शकतात असे नागरिक या शासकीय योजनांच्या लाभापासून दूर राहतात. म्हणूनच उत्तरदायित्व फाऊंडेशनच्या वतीने शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कामगार आयुक्तालय, ब वर्ग, कामगार अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या श्री. सुनील राठोड यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण विभागामार्फत ज्या योजना राबवल्या जातात त्यांची माहिती आयोजित कार्यक्रमांतर्गत दिली. त्यानंतर ज्या महिला पालक घरकाम करतात किंवा बांधकाम विभागात कष्टाची कामे करणाऱ्या पालकांनी आर्थिक लाभ मिळविण्याबाबत फॉर्म भरुन देण्याबाबत त्यांनी श्री. सुनील राठोड यांनी मार्गदर्शन केले. शासकीय योजनांचा लाभ घेऊन इच्छिणाऱ्या अर्जदार पालकांची कामगार मंडळाकडे सभासद नोंदणी फी उत्तरदायित्व फाऊंडेशन भरणार असल्याचे मुख्याध्यापक अर्जुन जगधने यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदादीप विद्यालयाच्या मराठीच्या शिक्षिका आणि समन्वयक राजश्री साळगे यांनी केले. मुख्याध्यापक जगधने सरांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली, यावेळी नंदादीप विद्यालयाचे पर्यवेक्षक राजगे सर आणि उत्तरदायित्व फाऊंडेशनचे सचिव श्री. प्रणितकुमार म्हस्के देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
महाराष्ट्र शासन कामगार विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांची यादी येथे देण्यात आली आहे. पात्रता निकष तपासून उत्तरदायित्व फाउंडेशनच्या मदतीने या योजनांचा लाभ पालक घेऊ शकतात.